शिबीर वृत्तांत

श्रीदाअ अभ्यासार्थी शिबीर, सज्जनगड – २०१९
image

जेथें श्रवणाचा उपाये | आणी परमार्थसमुदाये | तेथें जनासी तरणोपाये | सहजचि होये ||१-८-२१||

दरवर्षीप्रमाणे श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या सहकार्याने श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन अभ्यासार्थींचे शिबीर यावर्षी १२,१३, आणि १४ डिसेंबर २०१९ यादिवशी सज्जनगडावर आयोजित करण्यात आले होते.

दि.११, बुधवार दुपारपासून शिबिरार्थी गटागटाने सज्जनगडावर जमू लागले. प्रवासाचा शीण जाऊन अपूर्व उत्साह शिबिरार्थींच्या चेहऱ्यावर दिसत होता. रात्री प्रसादानंतर अण्णाबुवा कालगावकर सभागृहात श्री.सुहास कुलकर्णी यांनी शिबिराची रूपरेषा मांडून सर्वांना काही सूचना केल्या. नावनोंदणी आणि शिबिरार्थी बिल्ल्यांचे वाटप करून सर्वजण दुसऱ्या दिवशीपासून सुरु होणाऱ्या शिबिरासाठी सज्ज झाले. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील सुमारे १६० हून अधिक अभ्यासार्थी-समीक्षक शिबिराला उपस्थित होते.

गुरुवारी १२ डिसेंबरला गडावरील मान्यवर स.भ. विद्याताई पुरोहित आणि स.भ. शेवडेबुवा यांनी दीपप्रज्वलन करत शिबिराची औपचारिक सुरुवात केली. त्यानंतर सर्वांनी स.भ. मारुतीबुवांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला.

पहिल्या सत्रात उपक्रमाचे अध्यक्ष श्री. विजय गाडगीळ यांनी शिबिराविषयी प्रस्तावना केली. ‘पदाअ’ म्हणून प्रचलित असेलला हा उपक्रम आता श्रीग्रंथराज दासबोध अध्ययन अर्थात ‘श्रीदाअ’ म्हणून ओळखला जाईल असे त्यांनी जाहीर केले. श्रीदाअची उद्दिष्टे आणि काळानुरूप आवश्यक असणाऱ्या बदलाचे महत्व सांगून उपक्रमात होऊ घातलेल्या बदलांचे सुतोवाच केले. पुढील सत्रात त्यांनी ‘ग्रंथारंभलक्षण’ समासाचे प्रयोजन सांगताना ‘क्रिया पालटे तात्काळ’ हे मानवी जीवनाचे उद्दिष्ट असायला हवे असे प्रतिपादन केले.

सौ. यशस्विनी केंदुरकर यांनी समर्थसंप्रदायाच्या प्रस्थानत्रयीतील ‘मनोबोधा’चे प्रयोजन आणि महती सांगितली. ‘मना सज्जना राघवी वस्ति कीजे’ पालुपद असणाऱ्या मनाच्या श्लोकांचे सोपी प्रभावी उदाहरणे देत विवरण केले.

दुपारच्या प्रसादानंतर औरंगाबाद के.प्र., सौ. मानसी याडकीकर यांनी ‘मूर्खलक्षण’ समासावर निरुपण करताना सुरुवातीला समर्थांनी दासबोधात अन्यत्रसुद्धा कुविद्या-करंटलक्षणे का सांगितली यामागचा विचार सांगितला. मूर्खलक्षणांचे वर्तन,सवयी,वाणी असे गट करून त्यांचा त्याग करावा, आत्मपरीक्षण करावे कारण तेच आत्मनिवेदनाकडे नेणारे असते हा विचार मांडला. श्री. विजय गाडगीळ यांनी अभ्यासार्थींच्या पारमार्थिक तसेच अभ्यासाविषयीच्या शंकांचे निरसन प्रश्नोत्तरांच्या सत्रात केले.

सायंकाळी श्री.संतोष सप्रे यांनी शिबिरार्थींना गडदर्शन करवले. गडावरील प्रत्येक वास्तूचे ऐतिहासिक संदर्भ सांगत समर्थांच्या अस्तित्वाचा अनुभव घेण्याचे आवाहन त्यांनी केले. अत्यंत भारावलेल्या उपस्थितांनी ‘जय जय रघुवीर समर्थ’चा घोष करत श्रीसमर्थांप्रती आदर व्यक्त केला.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी, नाशिक केंद्राच्या अभ्यासार्थींनी वेळ आणि शिस्त पाळून सभागृहाजवळ सुंदर रांगोळ्या काढल्या आणि शिबिरार्थींना अत्तर, हळद-कुंकू लावून वातावरण मंगलमय केलं. श्रीदाअचे अध्यक्ष श्री. विजय गाडगीळ यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिबिराचा निरोप घेतला. उपक्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, कराड केंद्रसंचालक श्री. अनंत बोधे यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित शिबिर पार पडले.

सकाळच्या सत्रात सौ. कल्पना धर्माधिकारी यांनी श्रीदाअ उपक्रमात येत्या नववर्षापासून लागू असलेल्या बदलांबद्दल माहिती दिली. तीन पुस्तकांऐवजी प्रश्नपत्रिकांसह घरपोच सार्थ दासबोध असं या बदलाचं स्वरूप आहे. त्याबाबत असलेल्या शंकांचे निरसन श्री. सुहास कुलकर्णी यांनी केले. पुढील शिबिरात सर्वच अभ्यासार्थींचे या नव्या बदलाशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्न दिसून आले.

‘उत्तमपुरुषनिरुपण’ करताना श्री. सुहास कुलकर्णी यांनी धर्मस्थापनेचे नर हेच उत्तम पुरुष असे म्हटले. समास अधिक स्पष्ट व्हावा म्हणून या समासाची पार्श्वभूमी-अफजलखान वध-आपल्या देहबोलीतून सर्वांपुढे प्रभावीपणे मांडली.

श्री. डॉ. सुरेश पाठक, नाशिक के.प्र., यांनी समर्थांचा राष्ट्रधर्म म्हणजेच महाराष्ट्रधर्म या विषयावर आपले विचार मांडले. सर्वच संत राष्ट्रधर्मी होते हे त्यांनी पटवून दिले. धर्म संकल्पनेपासून समर्थांची व्यापक दृष्टी आणि कार्याची माहिती दिली. सहज येणाऱ्या भरपूर उदाहरणांनी त्यांचे व्याख्यान चढत्या क्रमाने रंगले.

या वर्षी ‘मी उपक्रमाच्या-दासबोधाच्या प्रसारासाठी वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो?’ या विषयावर अभ्यासार्थींचे पाच गट करून गटचर्चा झाली. ज्यात अनेक चांगल्या कल्पना पुढे आल्या. दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात गटचर्चेचा धागा पकडून मुंबई के.प्र., श्री. संतोष सप्रे यांनी श्रीदाअच्या सूत्रांपैकी ‘यत्न तो देव जाणावा’ समजावून सांगितले. ध्येयनिश्चिती आणि ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न, प्रयत्नांत परमेश्वराचे अधिष्ठान यांचे महत्व त्यांनी विषद केले.

शिबिरातील नियोजित सत्रं संपल्यावरही शिबिरार्थींची मनोबोध विशारद परीक्षा, देणगी तसेच ग्रंथखरेदीसाठी लगबग दिसून आली. पहाटे श्रीराम मंदिरात काकड आरतीसाठी आणि श्रीधर कुटी तसेच श्रीराममंदिरातील सायंउपासनेसाठी शिबिरार्थी श्रद्धेने आणि मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. रात्रीच्या प्रसादानंतर आनंदमेळ्यात अनेकांनी सहभाग घेऊन सर्वांना आनंद दिला.

श्रीसमर्थ सेवा मंडळाने प्रसंगी त्यांच्या वेळापत्रकात बदल करून सर्वतोपरी केलेले सहकार्य तसेच श्री. भास्कर बोकील यांनी परिश्रमपूर्वक केलेली व्यवस्था यामुळे शिबिरात कोणतीही अडचण आली नाही. शिबिराचे सूत्रसंचालन श्री.सुहास कुलकर्णी यांनी केले. श्री. बोधेकाकांनी शिबिरातील तीनही पद्ये सुरेल म्हणत शिबिरार्थींना त्यात सामील करून घेतले. शिबिराचे तिन्ही दिवस सकाळी ६ ते ७ या वेळेत श्री.कौलगेकर यांनी सहज सोपे योगप्रकार शिबिरार्थींकडून करून घेतले. सभागृहात फळ्यावर बोधचित्रे काढलेली होती तसेच श्रीदाअ उपक्रमाची सूत्रे आणि माहितीपर कापडी फलक लावलेले होते. शिबिरार्थींच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय सर्वांना व्हावा या हेतूने ‘परस्पर परिचय’ ह्या अभिनव कल्पनेद्वारे अभ्यासार्थींनी एकमेकांशी ओळख करून घेतली आणि शिबिराला करून दिली. शिबिराला सौ. नीलम जोशी(बदलापूर), सौ. ज्योती कोरबू(सांगली), श्री. प्रदीप गणोरकर(अकोला), श्री. तळवलीकर(गोवा), श्री. सुहास क्षीरसागर(पुणे व इ-मेल) हे केंद्रसंचालक तसेच पुणे केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. म. वि. जोशी उपस्थित होते.

शनिवारी शिबिराच्या तिसऱ्या दिवशी भूपाळीनंतर श्रीसमर्थ समाधीदर्शनाचा कार्यक्रम झाला. यावेळी सर्व शिबिरार्थीनी खणखणीत आवाजात रघुपतीचा नामगजर करत, अत्यंत शिस्तीत प्रभात फेरी काढली. त्यांनतर श्री. संतोष सप्रे यांनी श्रीदाअच्या ‘कर्ममार्गे उपासना’ या सूत्राबद्दल विवरण केले. प्रापंचिक कर्म करताना आपल्याला मिळालेल्या मेंदू-विचार-विवेकाच्या देणगीद्वारे ते कर्म निष्कामता ठेऊन करणे ही उपासनाच आहे असा विचार त्यांनी मांडला.

सकाळी ९.३० वाजता समारोपाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी स.भ. शरदबुवा रामदासी आणि स.भ. विद्याताई पुरोहित यांच्या हस्ते अभ्यासार्थींना प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. विद्याताईंनी ‘मुळात शुद्ध असणाऱ्या मुळाकडे जाण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा’ असं सांगून शुभेच्छा दिल्या. शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना शरदबुवांनी दासबोधाची फलश्रुती ‘निर्गुणब्रह्म तें निश्चळ | अंतरीं बिंबलें’ साधण्याचे ध्येय ठेवण्यास सांगितले. शिबिराबद्दल दोन अभ्यासार्थी आणि एका समीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री.सुहास कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. सौ. मानसी याडकीकरांच्या सुरात सर्व शिबिरार्थींनी सूर मिसळून आर्ततेने ‘कल्याणकरी’ म्हटले आणि शिबीर संपन्न झाले.

कल्लौ कीर्तन वरिष्ठ | जेथें होय ते सभा श्रेष्ठ | कथाश्रवणें नाना नष्ट | संदेह मावळती ||१-८-२९||

- आमोद रिसबूड, ठाणे.

|| जय जय रघुवीर समर्थ ||