\
उत्कट भव्य तेंचि घ्यावे । मळमळीत अवघेंचि टाकावें ।
निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळी ।। १६-६-१५ ।।
जे जे उत्कट आणि भव्य आहे तसेच जे हितकारक आहे त्याचा स्वीकार करावा. तेजोमय, गतिमान, बलवान गोष्टींचा स्वीकार करावा. आपल्या निस्पृह वृत्तीने जगामध्ये प्रसिद्ध व्हावे.
जगामध्ये जगमित्र । जिव्हेपाशी आहे सूत्र । कोठें तऱ्ही सत्पात्र ।
शोधून काढावें ।। १९-२-१९ ।।
जगामध्ये जगमित्र होण्यासाठी आपली वाणी गोड असणे आवश्यक आहे. आपल्या मधुर वाणीने लोकांना आपलेसे करावे. कोठेही गेले तरी त्या ठिकाणची उत्तम माणसे शोधून काढावीत.
कठीण शब्दे वाईट वाटते । हे तो प्रत्ययास येते । तरी मग वाईट बोलावे ।
ते काय निमित्ते ।। १२-१०-२३ ।।
आपल्याला कोणी कठोर बोलले तर जसे आपले मन दुखावते तसेच आपल्या कठोर शब्दाने दुसऱ्याचे मन दुखावू शकते. हा अनुभव आपल्याला येत असताना वाईट शब्द न बोलता विवेकाने शब्दांचा वापर करावा.
अवगुण सोडिता जाती | उत्तम गुण अभ्यासिता येती |
कुविद्या सांडून सिकती | शहाणे विद्या || १४-६-५ ||
अवगुण सोडायचे म्हंटले तर ते जाऊ शकतात. उत्तम गुण प्रयत्नपूर्वक अंगी बाणता येतात. शहाणी माणसे कुविद्या सोडून देतात आणि उत्तम विद्या शिकतात.
ऐक सदैवपणाचे लक्षण । रिकामा जाऊं नेदी येक क्षण ।
प्रपंच वेवसायाचे ज्ञान । बरे पाहे ।। ११-३-२४ ।।
आपल्या आयुष्यात वेळेला अतिशय महत्व आहे. आयुष्यातील कोणताही क्षण वाया न घालवणे हे भाग्याचे लक्षण आहे. जो व्यवसाय आपण करतो त्याचे उत्तम ज्ञान आपल्याला असावे. वेळेचा उत्तम उपयोग हे उत्तम व्यवस्थापनाचे लक्षण आहे.
निंदा द्वेष करू नये । असत्संग धरू नये ।
द्रव्यदारा हरू नये । बळात्कारे ।।२-२-७।।
कोणाची निंदा, द्वेष करू नये, कुसंगत धरू नये, कोणाची बायको, संपत्ती जबरदस्तीने काढून घेऊ नये. कारण या दोषांमुळे आपलेच मन दूषित होत असते. हे दोष आपल्या मध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. म्हणून या दोषांचा जाणीवपूर्वक त्याग करावा.
सवे लावता सवे पडे । सवे पडता वस्तू आतुडे । नित्यानित्य विचारे घडे ।
समाधान ।। ७-७-१५ ।।
मनाला आणि शरीराला जशी सवय लावावी तशीच लागते. ब्रह्मचिंतनाची सवय मनाला लावली तर ब्रह्मसाक्षात्कार होईल. त्याच बरोबर नित्य काय अनित्य काय याचा विचार ठेवला तर समाधान प्राप्त होईल. उत्तम व्यक्तिविकासासाठी उत्तम संगत, उत्तम सवयी, उत्तम विचार असा उत्तमाचा ध्यास घ्यावा त्याची सवय करून घ्यावी.
उत्तम संगतीचे फळ सुख । अधम संगतीचे फळ दुःख ।।
आनंद सांडूनियां शोक । कैसा घ्यावा ।। १७-७-१७ ।।
उत्तम संगतीचे फळ नेहमी सुख देणारे असते तर कुसंगतीचे फळ दुःख देणारे असते. असे असताना कुसंगतीत राहून पदरात दुःख का पाडून घ्यावे. माणूस संगतीमुळे तरतो अथवा बुडतो हे लक्षात ठेवून उत्तम संगतीचा आग्रह माणसाने धरावा. संगत नेहमी अशाच माणसांची धरावी ज्याच्या संगतीत आपले अंतरंग पालटते.
काही तरी धरावी सोये ।
अगांतुक गुणांची ।। १४-६-१ ।।
शरीराचे बाह्य सौंदर्य हे अभ्यास करून प्राप्त होत नाही तर ते जन्मतःच प्राप्त झालेले असते. पण उत्तम गुण मात्र अभ्यासानेच आपल्याला प्राप्त करून घ्यावे लागतात. या गुणांमुळे माणसाचे सौंदर्य अधिक खुलून येते. लोकांना त्याचा सहवास प्रिय होतो. जो माणूस चातुर्याने आपले अंतरंग सुधारतो तो खरा भाग्यवान ठरतो.
बहुतांचे मुखीं उरावें । बहुतांचे अंतरी भरावें । उत्तम गुणी विवरावें ।
प्राणिमात्रासी ।। १४-६-३२ ।।
आपल्या उत्तम वर्तनाने पुष्कळ लोकांच्या मुखात आपले नाव असावे. बहुतांच्या अंतःकरणा मध्ये प्रेमरूपाने भरून राहावे. आपल्या उत्तम गुणांनी अनेकांचे अंतरंग पालटावे त्यांना विवेकी बनवावे. स्वतः सकारात्मक विचार आणि वर्तन करावे आणि इतरांना देखील सकारत्मक ऊर्जा द्यावी.
हे अवघे आपणासी । येथे बोल नाही जनासी । सिकवावे आपल्या मानसी ।
क्षणक्षणा ।। १२-२-२३ ।।
आपल्या आयुष्यामध्ये सुख मिळवायचे का दुःखी जीवन जगायचे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. या बाबतीत दुसऱ्याला दोषी धरता येत नाही हे आपल्या मनावर सतत बिंबवत राहिले पाहिजे. सकारात्मक विचारांच्या आधारे आपण आपले मित्र व्हायचे का नकारत्मक विचार करून स्वतःचेच शत्रू व्हायचे हे आपल्याच हातात आहे.
जंव उत्तम गुण न कळे । तों या जनास काये कळे ।
उत्तम गुण देखतां निवाले । जगदांतर ।। १२-२-१८ ।।
माणसांमध्ये असणारे उत्तम गुण जो पर्यंत लोकांमध्ये प्रगट होत नाहीत तोपर्यंत लोकांना त्या माणसाच्या योग्यतेची कल्पना येत नाही. जोपर्यंत गुणांची पारख होत नाही तोपर्यंत त्या गुणांची कदर केली जात नाही. पण एकदा का गुण प्रगट झाले की जनताजनार्दन त्याची नक्की कदर करतात.
धान्य उदंड मोजिलें । परी त्या मापें नाहीं भक्षिलें । विवारल्याविण तैसें जालें । प्राणिमात्रासी ।। १८-५-१ ।।
मापाने खूप धान्य मोजून घेतले पण ते धान्य कांही ते माप खात नाही तसेच जो माणूस खूप ज्ञान प्राप्त करतो पण जो विचार करत नाही, मिळालेले ज्ञान कृतीत उतरवत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. जीवनामध्ये प्रपंच काय परमार्थ काय सर्वत्र विचारपूर्वक वागण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
कष्टेविण फळ नाही । कष्टेविण राज्य नाही ।
केल्याविण होत नाही । साध्य जनीं ।। १८-७-३ ।।
या जगात कष्टाशिवाय काही साध्य होत नाही. कष्टाशिवाय कोणते फळ प्राप्त होत नाही, राज्य मिळत नाही. आळस सोडून अविरत परिश्रम करून ध्येय गाठता आले पाहिजे. ज्यांनी भरपूर कष्ट केले आणि विवेकाने वर्तन केले त्यांचे भाग्य उजळून निघालें.
आधी कष्टाचें दुःख सोसिती । ते पुढें सुखाचें फळ भोगिती । आधी आळसें सुखावती । त्यासी पुढें दुःख ।। १८-७-५ ।।
जे लोकं आधी भरपूर कष्ट करून कष्टाचें दुःख भोगतात ते नंतरच्या काळात सुखाची फळं भोगतात, पण सुरवातीपासूनच आळसामध्ये लोळत सुखाचा अनुभव घेणाऱ्यांच्या पदरी नंतर दुःखच येते. आपल्याला सर्वस्वी बुडवणारा आळस हे करंटेपणाचे लक्षण आहे. दुःख निर्माण करणाऱ्या आळसापासून दूर रहावे हेच बरे.