दासबोध अभ्यासार्थी मेळावा

दासबोध अभ्यासार्थी मेळावा, ठाणे
image

जेथें श्रवणाचा उपाये | आणी परमार्थसमुदाये | तेथें जनासी तरणोपाये | सहजचि होये ||१-८-२१||

श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रमाच्या बदलापूर आणि मुंबई केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रीदासबोध अभ्यासार्थी मेळावा’ २ फेब्रुवारी २०२० रोजी समर्थभक्तांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला. ठाण्यातील मेळाव्याचे हे पाचवे वर्ष. या मेळाव्यात ठाणे, कळवा, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, बोरीवली, पनवेल येथील २६० हून अधिक समर्थप्रेमी आणि दासबोध अभ्यासार्थी उपस्थित होते.

या मेळाव्याला सज्जनगडावरील स.भ. शरदबुवा रामदासी उपस्थिती लाभली. मुंबई केंद्राचे केंद्र संचालक श्री. संतोष सप्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स.भ. रसिकाताई ताम्हणकर यांनी नवविधाभक्तीचा परामर्श घेऊन ‘नामस्मरणभक्ती’ या विषयावर सुंदर दाखले देत विवेचन केलं. पुढील सत्रात स.भ. शमिकाताई कुलकर्णी यांनी ‘अजपाजप’ हा अवघड आणि सखोल विषय श्रोत्यांना समजावून दिला. ‘ध्यानबिंदू’ उपनिषदाबद्दल माहिती दिली.

दुपारच्या प्रसादानंतर स.भ. सौ. गीता कुलकर्णी यांनी ‘सद्गुरूस्तवन’ मांडताना गीतेतील तसेच श्रीमनाच्या श्लोकांचे दाखले दिले. स.भ. श्री. रवींद्र राजाध्यक्ष यांनी ‘ग्रंथारंभलक्षण’ समासातील बारकावे अभ्यासपूर्णरीतीने श्रोत्यांसमोर मांडले. उत्तरोत्तर रंगत चाललेल्या कार्यक्रमाची सांगता स.भ. शरदबुवा रामदासी यांनी सर्वांना आशीर्वाद देऊन केली. बुवांच्या विलक्षण निरुपणाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. कल्याणकरी म्हणून शिबिराची सांगता झाली.

- आमोद रिसबूड, ठाणे.

|| जय जय रघुवीर समर्थ ||