\

दासबोध परिचय
image

दासबोध परिचय

श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबॊध हा ग्रंथ लिहिला आहे. समर्थ रामदास स्वामी स्वतःच म्हणाले आहेत की, 

माझी काया आणि वाणी | गेली म्हणाल अंत:करणी |

परी मी आहे जगज्जीवनी | निरंतर ||१ ||

आत्माराम दासबोध | माझे स्वरूप  स्वत:सिद्ध |

असता न करावा खेद | भक्तजनी ||२||

नका करू खटपट | पहा माझा ग्रंथ नीट |

तेणे सायुज्याची वाट | गवसेल की ||३||

 

ते म्हणतात दासबोध हे त्यांचे स्वत: चे स्वरूप आहे. काया आणि वाणी गेली तरी या ग्रंथाच्या रुपाने ते अजूनही या जगात आहेत असे म्हणण्याचे कारण की त्यांनी अनेक ग्रंथांचा संदर्भ तर घेतला आहेच, याशिवाय त्यांना आलेली आत्मप्रचीती सुध्दा त्यांनी तितकीच महत्वाची मानली आहे .

ग्रंथराज दासबोध २० दशक २०० समासांचा आहे. पण २० दशकी स्वरूप प्राप्त होण्याआधी पहिले एकवीस समासी रूप होते. त्यानंतर त्यांनी पहिले ६ दशक लिहिले. हे सहा दशक शिवथर घळीत लिहिले. ६व्या दशकाच्या ४थ्या समासात समर्थ म्हणतात, "च्यारी सहस्र सातसे साठी | इतुकी कलियुगाची राहाटी |" म्हणजे कलियुगाची चार हजार सातशे साठ वर्षे आत्तापर्यंत गेली, चार हजार सातशे साठ म्हणजे शके १५८१ म्हणजेच इ.स. १६५९ साली पहिल्या ६ दशकांची निर्मिती झाली.

त्यानंतर ७ वा दशक लिहिला गेला. त्यात ग्रंथ आरंभ करताना करताना जसे मंगलाचरण करतात तसे मंगलाचरण आहे. ७व्या दशकाच्या शेवटी समर्थ म्हणतात : "सरली शब्दांची खटपट | आला ग्रंथाचा सेवट | येथे सांगितले पष्ट | सद्गुरुभजन ||" या ग्रंथाचा शेवट झाला असे समर्थ म्हणतात .

आठवा दशक स्वतंत्र लिहिला आहे.  उरलेले समास अनेक स्फुट समास एकत्र करून तसेच एकवीस समासी मधून काही समास घेऊन वीस दशक २०० समास असणारा दासबोध आपल्या हाती मिळाला आहे. २० दशक २०० समासांची एकूण ओवी संख्या ७७५१ आहे.

हा ग्रंथ इतर ग्रंथांपेक्षा वेगळा आहे. काही भाविक लोक जरी या ग्रंथाचे पारायण करीत असले तरी हा प्रत्येक माणसाला जगायचे कसे हे शिकवणारा व त्यानुसार जगल्याने जीवन समृद्ध करणारा ग्रंथ आहे. प्रत्येक ग्रंथाची सुरुवात गणेश वंदनेने होते. पण या ग्रंथाची सुरुवात ग्रंथाच्या प्रस्तावनेने केली आहे. ग्रंथाच्या सुरुवातीलाच या ग्रंथात काय आहे आणि हा ग्रंथ वाचून किंवा ऐकून श्रोत्यांना काय मिळणार आहे हे स्पष्ट केले आहे. तसेच गणेश, शारदा, सद्गुरू, संत, सभा, नरदेह, परमार्थ यांचे स्तवन आहे. स्तवन करण्याचा हेतू हाच की ग्रंथ लिहिताना मी कर्ता‘ हा अहंकार नाहीसा व्हावा .

जरी हा ग्रंथ धार्मिक चिकित्सा करणारा किंवा भक्तिमार्ग दाखवणारा असला तरी तो सर्वांनाच मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ आहे. कोणत्याही प्रकारचे अवडंबर किंवा कर्मकांड या ग्रंथात सांगितलेले नाही. परंतू देव ही संकल्पना मात्र अत्यंत निःसंदिग्धपणे स्पष्ट करून सांगितली आहे.  समाजातील सर्व स्तरांतील म्हणजेच शालेय विद्यार्थ्यांपासून गृहस्थ, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक, उद्योगपती, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच हा दासबोध मार्गदर्शन करतो. विशेष म्हणजे दासबोध दैववाद शिकवत नसून प्रयत्नवाद शिकवतो. समर्थ रामदास 'यत्न तो देव जाणावा.' असेच म्हणतात. प्रयत्न न करणाऱ्याला समर्थ करंटा म्हणतात. 

माणसाने काय करू नये किंवा चांगला माणूस होण्यासाठी आपल्यातून काय काढून टाकावे यासाठी मूर्ख लक्षणे सांगितली आहेत. माणसांचे विविध स्वभाव समजावून सांगण्यासाठी सत्व, रज व तम गुणांची लक्षणे सांगितली आहेत. एखादा माणूस कसा चुकत जातो व अंती कसा सर्वनाश करून घेतो हे दाखवण्यासाठी करंट्या माणसाची कहाणी सांगितली आहे. तसेच माणसाला संसारात जो विविध प्रकारचा त्रास होतो त्याचे वर्गीकरण करून अध्यात्मिक, आदिभूतिक व आदिदैविक असे त्रिविध ताप अत्यंत सोपे करून सांगितले आहेत. अध्यात्मिक ताप या समासात सांगितलेले विविध प्रकारचे आजार आज कोणताही डॉक्टर पटापट सहज सांगू शकणार नाही. यावरून समर्थ रामदास स्वामींची निरीक्षण शक्ती किती सूक्ष्म व प्रभावी होती हे दिसून येते. हे तीन समास प्रत्येकाने अवश्य वाचावेत असेच आहेत. यातून आपल्याला संसारात कोणता त्रास होतो आहे, तो कोणत्या प्रकारचा आहे व त्यावर काय उपाय असू शकेल हे सहज समजून येते.

नवविधा भक्ती या दशकात श्रवण, कीर्तन वगैरे भक्तीचें प्रकार उलगडून सांगितले आहेत. परंतू या समासांच्या वाचनाने आपण आपले ज्ञान कसे वाढवू शकतो हेही समजते.

माणसाला अनादी काळापासून 'मी कोण आहे?', 'मी कोठून आलो आहे?' 'मी कोठे जाणार आहे?' हे तीन प्रश्न पडले आहेत; त्यांची उत्तरे या ग्रंथात मिळतात. त्यासाठी हा ग्रंथ नीट समजून पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे.

समर्थ रामदास स्वामींनी या ग्रंथात विज्ञानावर आधारित अशी विश्व निर्मितीची कथा लिहिली आहे. तसेच समर्थ या ग्रंथात तीन महत्वाचे सिध्दांत सांगतात.

१ जगात एक प्रचंड, शक्तीमान, ज्ञानसंपन्न जाणीव आहे. तिलाच समर्थ जगज्जोती म्हणतात. (जिला आजच्या परिभाषेत 'गॉड पार्टीकल' म्हणून शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.) 

पिंड व ब्रह्मांड दोन्ही ला प्रलय आहे. ते दोन्ही नाश पावतात.

३ स्वस्वरूपाचा विसर हीच माया म्हणजे पापतर स्वस्वरूपाचे स्मरण हेच ब्रह्म म्हणजे पुण्य.  

समर्थ रामदास स्वामींनी नेहमीच सामर्थ्याची महती गायिली आहे. सामर्थसंपन्न माणूस, सामर्थ्यसंपन्न राष्ट्र आपले आणि इतरांचे जीवन सुखी व आनंददायी करू शकतात, हे त्यांनी विविध दाखले व प्रमाण देऊन पटवून दिले आहे. समाजासमोर आदर्श ठेवण्यासाठी त्यांनी श्रीराम व हनुमान यांचे महत्व सांगितले आहे.

भगवंताचे स्मरण करण्याचे सामर्थ्य फक्त माणसातच असते. सर्व दिसणा-या विश्वाला धारण करणारी जी जाणीव तोच खरा देव, खरा भगवंत, श्रेष्ठ अंतरात्मा असे समर्थ सांगतात. ज्याची जाणीव व विवेक विशाल असतो त्याला अवतारी पुरुष म्हणतात, असे अवतारी पुरुषच लोकसंग्रह करतात असे समर्थ सांगतात.  यावरुन समर्थ रम्दस हे सुद्धा एक अवतारी पुरुषच होते हे लक्षात येते.

सूर्य, पृथ्वी, आप, तेज, वायू   यांचे मानवी जीवनातील महत्व विशद करण्यासाठी त्यांचे स्तवन केले आहे. 

असा हा दासबोध ग्रंथ प्रपंच करुन परमार्थ करायला शिकवतो. व्यावहारिक आणि अध्यात्मिक दोन्ही गोष्टी सांगतो. हा ग्रंथ व्यावहारिक जीवनात अत्यंत उपयुक्त आहे. यात सांगितलेल्या वेगवेगळ्या विषयांमधुन व्यवस्थापनही शिकायला मिळते. 

* जय जय रघुवीर समर्थ *