\

श्री समर्थ सेवा मंडळ

श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सदगुरूस विश्रांती मिळावी या हेतूने श्री समर्थांसाठी सज्जनगडावर मठ बांधून दिला आणि गडाची उत्तम व्यवस्था राखण्याचे आदेश दिले. इ.स. 1676 साली समर्थ कायमस्वरुपी सज्जनगडावर वास्तव्यासाठी आले. या गडावर समर्थांचे वास्तव्य शेवटची सहा वर्षे होते. इ.स. 1682 जानेवारीला समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवला.

ज्या ठिकाणी समर्थांना अग्निसंस्कार केला त्या ठिकाणी तळघरात समाधी मंदिर व त्यावर राममंदिर, छत्रपती संभाजीराजांनी बांधले. समर्थांच्या पश्चात अक्कास्वामी व दिवाकर गोसावी यांनी सज्जनगड व चाफळ येथील कारभार सांभाळला.

त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी इ.स. 1710 माघ शुक्ल पंचमी या दिवशी श्री समर्थांचे थोरले बंधू श्रेष्ठ गंगाधर यांचे नातू गंगाधरबुवांना सज्जनगडावर आणून चाफळ व सज्जनगडाचा कारभार त्यांच्या स्वाधीन केला. इ.स. 1847 पर्यंत पुत्रपरंपरेने कारभार चालला. महारुद्र स्वामींना पुत्र नसल्यामुळे त्यांनी लक्ष्मणस्वामींना दत्तक घेतले. तेव्हापासून दत्तक परंपरेने सज्जनगडाचा कारभार सुरु झाला.

याच सुमारास इ.स. 1848 ला छत्रपतींचे सातारा येथील राज्य खालसा होऊन इंग्रजांची सत्ता सुरु झाली. यामुळे राजघराण्याचे चाफळ व सज्जनगडाकडे दुर्लक्ष झाले. देवस्थानाचे उत्सव व नैमित्तिक कार्य याकरीतादेखील पैसा अपुरा पडू लागला. मठाची दुर्दशा होऊ लागली.

स.भ. नानासाहेब देव

इ.स. 1901 च्या दरम्यान इतिहासाचार्य राजवाडे यांनी " रामदास " हा निबंध प्रकाशीत केला, यामुळे समर्थांच्या अभूतपूर्व राष्ट्रीय कार्याचे ज्ञान समाजास झाले. धुळ्याचे स.भ. नानासाहेब देव यांचे या निबंधाकडे लक्ष वेधून समर्थांचे अप्रसिद्ध वाङ्मय छापण्याचा देवांनी संकल्प केला. त्यानंतर त्यांनी डोंमगाव येथे जाऊन कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील दासबोधाच्या मूळ प्रती वरून दुसरी प्रत तयार केली आणि ती तपासून 1905 साली रामदास-रामदासी या मालिकेतील पहिला भाग म्हणून सटीप दासबोध छापला.

1904 पासून त्यांनी अथक प्रयत्न करून समर्थ सांप्रदायाच्या मठांचे संशोधन केले आणि समर्थ सांप्रदायाचा वाङ्मयीन ठेवा ( हस्त लिखिताची बाडे ) गोळा केला. अप्रकाशित वाङ्मयाच्या प्रकाशनाला सुरुवात केली. यामुळे समर्थ कृत वाङ्मय लोकांसमोर आले.

समर्थ सांप्रदायीक स्थानांचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून भारत भर प्रवचने करून 1932 साली समर्थांच्या जन्म स्थानी जांब येथे नाना साहेब देवांनी समर्थ मंदिर बांधले आणि ते ट्रस्टच्या हवाली केले.

1935 साली समर्थ वाग्देवता मंदिर धुळे येथे उभे केले व त्यात समर्थ सांप्रदायाचा वाङ्मय़ीन ठेवा जतन केला.

1939 साली समर्थ सांप्रदायाच्या जीर्णोद्धारासाठी ठिकठिकाणी समर्थ संघ निर्माण केले. समर्थ सांप्रदायाला ऋणी करून 1958 साली नाना साहेब देव समर्थपदी लीन झाले.

1927 साली श्रीधर स्वामी सज्जनगडावर आले आणि समर्थांची सर्व प्रकारे सेवा करून, व साधना करून समर्थ कृपा संपादन केली. 1930 साली कर्नाटकात गेलेव तेथे समर्थ सांप्रदायाचा प्रसार केला.

1935 साली ते पुन्हा गडावर आले तेव्हा दिनकर बुवा, अय्याबुवा, दत्ताबुवा असे साधने करिता आलेले रामदासी त्यांच्या भोवती गोळा झाले. ही सर्व रामदासी मंडळी जमेल तशी समर्थ सेवा निस्पृहपणे करीत होती. त्यावेळी सज्जनगडावरील देवस्थानाची व्यवस्था समाधानकारक नव्हती, कारण इ.स. 1928 सालापासून बापूसाहेब स्वामींनी पुत्रांतील कलहामुळे व संस्थानला कर्ज झाल्यामुळे संस्थानचा कारभार कोर्ट ऑफ वॉर्डस्कडे सोपविला होता. देवालयांचे व वास्तूंचे दैन्य अनेकांना विषण्ण करीत होते.

त्यावेळी साधनेसाठी येऊन राहिलेले दिनकरबुवा, अय्याबुवा, दत्ताबुवा, अण्णाबुवा असे अनेक रामदासी एकत्र येऊन 1939 साली नानासाहेब देवांच्या प्रेरणेने सज्जनगडावर "समर्थ संघाची शाखानिर्माण झाली. या रामदासींना माध्यान्हीच्या जेवणाची सोय नव्हती. हे रामदासी एक-दोन दिवसांनी गडाखालील खेडेगावांमधून भिक्षा आणून स्वयंपाक करून समर्थांना नैवेद्य दाखवित असत.

इ.स. 1947-48 च्या दरम्यान उद्योगपती समर्थभक्त बाबुराव वैद्य, सातारा हे गडावर आले व समर्थपूजेतील जीर्ण उपकरणे पाहून येथील जीर्णोद्धार करण्याचा त्यांनी संकल्प केला. येथील दिनकरबुवा वगैरे रामदासींना घेऊन विचार विनिमय केला व समर्थसेवेकरीता एक मंडळ निर्माण करण्याचे ठरविले. मंडळाची घटना तयार करून दिनांक 9 जानेवारी 1950 रोजी प.पू. श्रीधरस्वामींचा आशीर्वाद घेऊन श्री समर्थ संप्रदायाच्या जीर्णोद्धारासाठी "श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड" ही संस्था स्थापन करून कायद्यानुसार रजिस्टर्ड केली.

"श्री समर्थांच्या कार्याचा, तत्वज्ञानाचा , वाङ्मयाचा प्रसार सर्वत्र करून श्री समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सर्व स्थानांचे नंदनवन करा, समर्थ तुमच्या पाठीशी आहेत " असा आशीर्वाद श्री श्रीधर स्वामींनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिला. समर्थ सेवेचा आदर्श श्रीधर स्वामींनी घालून दिला होताच, त्या आदर्शा प्रमाणे मंडळाचे निस्पृह कार्यकर्ते सज्जनगडाचा काया पालट करण्या करीता झटू लागले.


श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्य

९ जानेवारी १९५० या दिवशी श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड ही संस्था रजिस्टर्ड झाल्यानंतर समर्थभक्त बाबुराव वैद्यांनी आपल्या कल्पक बुद्धीने या संप्रदायाचा जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक योजना आखल्या.

श्री समर्थ सेवा मंडळ स्थापन झाले त्यावेळी सज्जनगडावर येण्यासाठी परळीच्या पायथ्या पासून संपूर्ण गड चढावा लागत असे. गडावर आल्यावर राहाण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, नित्यविधीची धड सोय नाही, वीज नाही. यामुळे उत्सव सोडला तर एरवी भाविकांची ये-जा नसे. भाविकांचा सहभाग असल्याशिवाय समर्थकार्याचा प्रसार होणार नाही हे जाणून कै.बाबुराव वैद्य यांनी श्रीसमर्थांच्या पादुका घेऊन महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर भिक्षा दौरा आयोजित करण्याची संकल्पना मांडली आणि निस्पृह रामदासींच्या सहकार्याने ती मूर्त स्वरुपात आणली. प्रथम बद्रीनारायणाला पादुका नेल्या, वाटेत मोठी शहरे घेतली त्यावेळी झालेल्या स्वागत सोहळ्यामूळे श्रीसमर्थकृपेची ओढ समाजात किती आहे याचा प्रत्यय आला आणि पादुका प्रचार दौ-याची कार्यपद्धती निश्चित झाली.

१९४९ पासून श्री समर्थ सेवा मंडळाने चालू केलेल्या पादुका प्रचार दौ-यामुळे लोकांना समर्थ कार्याचा, वाङ्मयाचा, तत्वज्ञानाचा परिचय झाला. या प्रचार दौ-यांमुळे सज्जनगडावर दर्शनार्थींचा ओघ सुरू झाला. समर्थ कार्यासाठी आवश्यक अर्थसहाय्य लाभले, यातूनच जीर्णोद्धाराच्या कार्याला गती मिळाली. २००० साली प्रथम भारताबाहेर सिंगापूर येथे श्री समर्थ पादुकांचा प्रचार दोरा आयोजित केला. २००८ पासून प्रतिवर्षी विदेशात हा दौरा आयोजित करण्यात येतो.

समर्थ विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुद्रीत स्वरुपात प्रचार साधन हवे म्हणून १९५१ला प्रथम पत्रिकास्वरुपात व लगेचच मासिक स्वरुपात ‘सज्जनगड’ मासिक सुरु झाले. त्यामुळे समर्थांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा, कार्याचा आणि वाङ्मयाचा परिचय महाराष्ट्रात झाला. सेवा मंडळाने हाती घेतलेल्या समर्थ संप्रदायाच्या जीर्णोद्धार कार्याचा लोकांत प्रचार झाला. मासिकाला परदेशातूनही मागणी येऊ लागली. मासिकाच्या निमित्ताने अनेक मान्यवर लेखकांनी सरस्वतीची उपासना केली आणि त्याचा लाभ हजारो वाचकांनी घेतला, घेत आहेत.

समर्थ वाङ्मय लोकांपर्यंत पोहोचवून लोककल्याण साधावे या हेतूने समर्थ सेवा मंडळाने १९५३ पासून ग्रंथ प्रकाशनास सुरुवात केली. त्यात प्रथम सचित्र सज्जनगड, मनाचे श्लोक, समर्थ चरित्र, नित्यनेम सोपान, समर्थांचे फोटो यांचे प्रकाशन झाले.

या प्राथमिक उपक्रमाबरोबरच बाबुराव वैद्य यांनी मान्यवरांच्या भेटी घेऊन राष्ट्रगुरु श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या सज्जनगडाचा जीर्णोद्धार किती आवश्यक आहे हे पटविले. त्यातून नियमित वर्गणी देणारे लोक मिळविले. काहींनी मोठ्या देणग्या दिल्या. सामान्य लोकही जमेल तेवढी मदत करु लागले. येणा-या पैशाचा चोख हिशोब व पत्रव्यवहार स.भ. माधवराव हिरळीकर यांनी उत्तम सांभाळला.

येणा-या देणगीतून एकीकडे जीर्णोद्धाराच्या कार्याला दिनकर बुवा, अय्याबुवा आदि निस्पृह रामदासींनी वाहून घेतले. सज्जनगडाचा काया पालट होऊ लागला.

मंदिरातील पूजा अर्चा व नैवेद्याची उत्तम व्यवस्था करून सेवा करणा-यांची भोजन व्यवस्था केली. मोडकळीस आलेला समर्थांचा मठ दुरुस्त करून दुमजली बांधणी केली व गॅलरी उभारली. मंदिराचे शिखर दुरुस्त केले. समर्थभक्त वणीकर, पुण्याचे समर्थभक्त देवल व समर्थभक्त भाऊराव आठवले यांच्या सहकार्याने १९५३साली वसंतपंचमीचे दिवशी समर्थमंदिरासाठी सोन्याचा मुलामा दिलेला कळस मंदिरावर बसविला. गडावरील तळ्यातील गाळ काढला. समर्थांच्या पूजेला मुबलक तुळशी व फुले हवी म्हणून बागेची जोपासना केली. समर्थांचा ३५०वा जन्मोत्सव भव्य प्रमाणात सज्जनगडावर साजरा केला. त्याकरिता श्रीधर स्वामींनी वर्षभर अनेक ठिकाणी प्रवचने करून समर्थ संप्रदायाचा प्रसार केला आणि सज्जगडावर समर्थ सांप्रदायिकांचे संमेलन भरविले. १९५९साली सज्जनगडावर भव्य कीर्तन संमेलन आयोजित केले. १९५९साली १३ कोटी रामनाम जपाचा संकल्प सोडला व त्याच वर्षी त्याची सांगता झाली. १९६१साली लोकमान्य टिळकांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘लोकमान्य टिळक कमान बांधली’. १९६६साली सातारा येथे ‘समर्थ सदन’ ही वास्तू खरेदी केली. ज्यांना गडावर येणे शक्य नाही त्यांच्यासाठी समर्थ सदनमध्ये दासनवमी उत्सव सुरु केला. आता तेथे मंडळाचे सांस्कृतिक केंद्र आहे. १९६८ ते १९७२ या चार वर्षात चाफळ येथील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमान मफतलाल शेठ यांच्या सहकार्याने श्री समर्थ सेवा मंडळाने पूर्ण केला. १९६५ साला पासून महाडच्या कै.अप्पा वैद्य यांनी शिवथरघळ येथे दासबोध अभ्यास वर्ग सुरु केला. त्या उपक्रमातूनच १९७८ साला पासून द्वा. वा. केळकर यांनी ‘पत्रद्वारा दासबोध अभ्यासक्रमा’ची संकल्पना साकार केली व दासबोध अनेकांपर्यंत पोहोचविला. या उपक्रमामुळे अनेक ठिकाणी दासबोध अभ्यास मंडळे सुरु झाली. १९८५ साली समर्थ विद्यापीठाची स्थापना मामासाहेब गांगल यांनी शिवथरघळ येथे केली. आता या विद्यापीठाचा कारभार समर्थ सदन सातारा येथून चालतो. १९७५ साली सुगम विवरण असलेला स. भ. प्रा. के. वि. बेलसरेकृत सार्थ दासबोध साधकांच्या सोयीसाठी श्री समर्थ सेवा मंडळाने प्रकाशित केला. आतापर्यंत(दासनवमी २०२०) त्याच्या २९ आवृत्या निघाल्या आहेत. भाविकांसाठी ५० खोल्या बांधल्या. ८ शौचालय व ८ स्नानगृहे बांधून त्या ठिकाणी पाण्याची सोय केली. गोशाळा बांधली. १९७६ पासून सज्जगडावर एस्.टी येऊ लागली, तेथून गडावर येण्याकरिता सेवा मंडळाने २२५ दगडी पाय-या बांधून वरती येण्याचा मार्ग सोपा केला. उरमोडी नदीचे पाणी खेचून सज्जनगडावर आणले आणि त्या करीता मोठा जलकुंभ बांधला आणि नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय केली. गडाच्या भोवती ६ फूट रस्ता करून सृष्टी सौंदर्य पाहाण्यासाठी ठिकठिकाणी कट्टे बांधले. कल्याण उडी व ब्रह्मपिसा असे ओटे बांधून त्यावर मारुती स्थापन केले व पत्र्याचे आछादन केले. भांडारगृह व अंग्लाईचे मंदिर बांधले. २००७ साला पासून श्री समर्थ सेवा मंडळाने संत साहित्याचा प्रचार प्रसार करणा-या मान्यवारांना संत सेवा पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात केली. १९८५ सालापासून १५ वर्षाच्या पुढील मुलांसाठी सज्जनगडावर संस्कार वर्ग चालू करण्यात आला. आता २०१२ पासून तो वर्ग १० ते १४ वयोगटाच्या मुलांसाठी घेण्यात येतो.

याप्रमाणे श्री समर्थ सेवा मंडळाच्या कार्याला श्री श्रीधर स्वामींचा आशिर्वाद व कै. बाबुराव वैद्य व कै. माधवराव हिरळीकर, कै. बन्याबापू गोडबोले , स.भ. अरूणराव गोडबोले , माजी कार्यवाह कै. दिनकर बुवा, माजी कार्यवाह कै. मारुतीबुवा आणि विद्यमान कार्यवाह स.भ. योगेशबुवा रामदासी व इतर अनेक निस्पृह रामदासी मंडळी यांचे अथक प्रयत्न व असंख्य दानशूर भक्तांचे तन-मन-धनाचे सहाय्य यातून सज्जनगडाचा काया पालट झाला व दूरवर संप्रदायाचा प्रसार झाला आहे, होत आहे.

१९३८ सालापासून सुरु केलेल्या कार्याचा आता वटवृक्ष झाला आहे. हे समर्थ विचार प्रसार कार्य यापुढेही समर्थ भक्तांच्या व सेवा मंडळाच्या तळमळीच्या कार्यकर्त्यांकडून सज्जनगडावर व शिवथरघळ येथे असेच जोमाने सुरु राहील.

अधिक माहितीसाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला जरूर भेट द्या. http://www.shrisamarthsevamandal.org/