\

उपक्रमाबद्दल

उपक्रमाबद्दल

घरा-घरातून श्री समर्थांचे भव्य दिव्य विचार पोचवावे, समाजात समर्थांची विचारधारा रुजवावी, परत एकदा शिवराज्य-रामराज्य यावे, गर्तेकडे चाललेल्या भोगवादी चंगळवादी समाजाला सावरावे, समर्थांच्या वाणीत सांगायचे तर ‘शहाणे करून सोडावे सकळ जन!’ अशी समाजप्रबोधनाची आस मनी धरून कै.स.भ.द्वा. वा. केळकर तथा अप्पा व गीताताई केळकर यांनी "पत्रद्वारा दासबोध अभ्यास" हा उपक्रम सुरू केला. कितीतरी उपक्रम येतात व जातात, नंतर त्यांची आठवणही नसते . पण पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा उपक्रम निरंतर राहिला व सातत्याने वाढला. साधारण १ लाख लोकांनी आजपावेतो हा अभ्यास केला आणि आज ही दरवर्षी हजारो विद्यार्थी ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास करत आहेत. अप्पा नेहमी म्हणत, ‘ अनर्थकारी अर्थापासून हा उपक्रम दूर आहे.’ येथे कुणालाही मानधन नाही, पगार नाही. सर्व समीक्षक "सेवा" म्हणून काम करतात! श्री समर्थांची शिकवण त्रिकालाबाधित आहे. आज महाराष्टातच नव्हे तर त्याबाहेर भारतात व परदेशातही हा अभ्यास पोचला आहे. आता इंटरनेटवरून आमची तरुण पिढीदेखील हा अभ्यास करते आहे. या उपक्रमाला तरुण नेतृत्वही लाभले आहे, ते नव्या नव्या कल्पना राबवत आहेत ही मोठी जमेची बाजू आहे..

१.पत्राद्वारे अभ्यास करायचा असल्यास दोन्ही बाजूंचा टपाल खर्च अभ्यासार्थीनी करावा लागतो. स्वाध्याय साधनात दिलेला ग्रंथराज दासबोध हेच मुख्य पुस्तक.

२.अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे(दासबोध प्रवेश, दासबोध परिचय, दासबोध प्रबोध). दर वर्षाच्या शेवटी प्रशस्तीपत्र दिले जाते. दासबोधात अध्यायाऐवाजी समास हा शब्द वापरलेला आहे. दहा समासांच्या संचाला दशक म्हणतात. असे वीस दशक म्हणजे २०० समास आहेत. पहिल्या वर्षी निवडक १२ समास, दुस-या वर्षी निवडक २६ समास, तिस-या वर्षी ३५ समास अभ्यासता येतात.

३.अभ्यास प्रश्नोत्तररूपी आहे. त्या त्या महिन्यातील समासाचे महिनाभर वाचन-मनन अपेक्षित आहे. (या वाचनाला सुमारे दहा मिनिटे पुरतात.)
अ) पत्रद्वारा : दरमहा एक स्वाध्याय फुलस्केपवर लिहून समीक्षकांकडे उत्तराच्या पोस्टेजसह पाठवायचा असतो.
आ) इमेलद्वारे : हस्तलिखित स्कॅन करून/ Microsoft Word मध्ये टाईप करून समीक्षकांकडे इ-मेलवर पाठवायचा असतो.

४.अभ्यासक्रमाची रचना माहीत असलेल्या विषयातून क्रमाक्रमाने नवीन संकल्पनाकडे जाणारी अशी केली आहे.

प्रवेश, परिचय आणि प्रबोध असा हा तीन वर्षाचा, ३६ स्वाध्यायाचा अभ्यासक्रम असून तीनही वर्षाचे एकत्रित शुल्क रू. ३००/- इतके आहे. पहिला स्वाध्याय स्वीकारार्ह असल्यास अभ्यासक्रमाचे शुल्क भरून आपला अभ्यासार्थी क्रमांक/समीक्षक क्रमांक निश्चित करावा. आपल्या तीन वर्षाचा अभ्यासक्रमासाठी लागणारा ग्रंथ आणि साधन सामुग्री (स्वाध्याय-साधन) आपल्या पत्त्यावर पाठवली जाईल. हे स्वाध्याय साधन आपल्या तीनही वर्षाच्या अभ्यासासाठी लागणार आहे. त्यांचे मूल्य आपल्या अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये समाविष्ट आहे.आपण अभ्यासक्रमाचे शुल्क भरल्यावर श्री सज्जनगडावरून श्री समर्थांचा प्रसाद आणि स्वाध्याय साधन आपण संकल्प पत्रावर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवण्यात येईल, पैसे भरल्यानंतर ३० दिवसांत स्वाध्याय साधन आपल्या पत्त्यावर न आल्यास या ८६६९४०५९७१ नंबरवर संपर्क साधावा.

उपक्रमाच्या शुल्काबाबत महत्वाचा खुलासा : उपक्रम शुल्कात समाविष्ट असलेले स्वाध्याय साधन हे केवळ अभ्यासार्थीसाठी आहे, त्यामुळे पहिला स्वाध्याय केंद्राकडे पोचल्यावरच ‘स्वाध्याय साधन’ आपल्याकडे रवाना होईल. स्वाध्याय न आल्यास भरलेले शुल्क ‘उपक्रमास देणगी’ म्हणून समर्थकार्यासाठी अर्पण होईल, कोणत्याही परिस्थितीत उपक्रम शुल्काचा परतावा मिळणार नाही.

१.केंद्राकडे पहिला स्वाध्याय आणि उपक्रम शुल्क दोन्ही प्राप्त झाल्यावरच प्रवेश देण्यात येईल.

२.अभ्यासार्थीनी पहिला स्वाध्याय अगदी सावकाशपणे वाचून सोडवावा. पाच प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुमारे एक फुलस्केप कागद लागतो.

३.अ) पत्रद्वारा :
सोबत पूर्ण माहिती लिहिलेले संकल्प पत्र (स्वत:ची साक्षरी करून)आणि पहिला स्वाध्याय आपण ज्या विभागात राहतो त्या विभाग केंद्र संचालकांकडे पोस्टाचे पाकिटातून पाठविणे आवश्यक आहे. सोबत स्वाध्याय साधन पावती क्रमांक नमूद करावा. संकल्प पत्र, पहिला स्वाध्याय आणि विभाग व केंद्र संचालकांचे पत्ते/संपर्क ‘डाउनलोड्स’ मधून घेता येईल.
उत्तरासाठी स्वत:चा पत्ता लिहिलेले पोष्टाचे पाकीट पाठवावे. त्यातून आपणास पहिल्या स्वाध्यायाचे समीक्षण, काही पुढील अभ्यासासंबधी व्यावहारिक सूचना आणि यापुढील स्वाध्यास दरमहा ज्या समीक्षकाकडे पाठवायचे असतात त्यांचे नाव, पत्ता, संपर्कासाठी फोन नं. ही माहिती पाठवली जाईल.
आ) इ-मेलद्वारा :
पहिला स्वाध्याय (PDF फॉरमॅटमध्ये) dasbodh.abhyas@gmail.com या इ-मेल आयडीवर इ-केंद्रसंचालकांना पाठवावा. पहिला स्वाध्याय ‘डाउनलोड्स’ मधून घेता येईल. मेलमध्ये स्वाध्याय साधन पावती क्रमांक नमूद करावा.
आपणास पुढील अभ्यासासंबधी काही व्यावहारिक सूचना आणि यापुढील स्वाध्यास दरमहा ज्या समीक्षकाकडे पाठवायचे असतात त्यांचे नाव, इ-मेल आयडी, संपर्कासाठी फोन नं. ही माहिती पाठवली जाईल.

४.उपक्रम पत्रद्वारे / ईमेलद्वारे असल्याने वरील सर्व माहिती परिपूर्ण असणे महत्त्वाचे आहे. तसेच त्यातील बदल त्वरित कळविणेही आवश्यक आहे.
स्वाध्याय/संकल्प पत्रात कोणतीही त्रूटी असल्यास प्रवेश दिला जाणार नाही.

स्वाध्याय साधन शुल्क भरण्यासाठी येथे क्लिक करा

आपण समाधानी आहात काय? माणसाचे खरे समाधान कशात आहे? आपल्या प्रयत्नांना दरवेळी यश येतेच कां? आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे हे आपणास माहीत आहे काय? थोडे आत्मपरीक्षण केल्यास या सा-या प्रश्नांचे एकच उत्तर आढळते.

नाही...... नाही..... नाही...

“अस्थिरता, अनिश्चितता, असमाधान आणि भीती” अशीच सध्याची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत काय केले पाहिजे आणि ते कसे करता येईल? याचा सर्वागीण विचार आणि शिकवण दासबोधात आहे. आपल्यात परिवर्तन घडवून आणण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

१.व्यक्तिगत विकास आणि स्वावलंबानाची सवय यामुळे परिस्थितीवर नियंत्रण करण्याची तुमची क्षमता वाढेल.

२.परस्परावलंबित्वाची योग्य जाण निर्माण करून सहकार्याची भावना वाढेल. इतर अनेकांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण करण्याची योग्य दिशा आपणास मिळेल.

३.योग्य तत्त्वज्ञानाची स्पष्ट दृष्टी आपल्याला मिळते. त्यातून नियंत्रणाच्या पलिकडे असलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता आपल्यात येईल.

श्रीमद् ग्रंथराज दासबोध अध्ययन (पत्रद्वारा आणि ईमेलद्वारा) हा अभ्यास प्रश्नोत्तररूपी आहे. त्यातून विचारांना योग्य दिशा मिळते. अभ्यासात सातत्य असल्याने विचारातून परिवर्तन होऊन दासबोधाचे अंतरंग उलगडत जाते. आध्यात्मिक संकल्पना स्पष्ट होतात. नरदेहाचे महत्व, मर्यादा आणि सार्थक कशात आहे हे कळते. देव ही काय कल्पना आहे आणि तो कसा शोधावा याचा मार्ग सापडतो. प्रपंच परमार्थस्वरूप होतो. जीवनाविषयी नवीन दृष्टी लाभून आत्मचिंतनाची सवय लागते. “आत्मिक विकासाबरोबर समाजाचा विकास” ही विचारधारा दृढ होऊ लागते.

दासबोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनात नैराश्यप्रसंगी मानसिक आधार देऊन नवचैतन्य निर्माण करतात. अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक होतात. मनातले संभ्रम दूर करतात. अनाठायी असलेल्या आसक्ती कमी करतात. योग्य व्यवहार लक्षात घेऊन तो आचरणात आणण्याचे बळ देतात. आत्मविश्वास वाढतो. साधेच पण निश्चित गुणकारी असेच हे औषध आहे असा अनेक अभ्यासार्थीना अनुभव आहे.

श्री. अशोक विष्णू गानू.

बी.ई. मेकॅनिकल. स्वत:ची इंजीयरींग फर्म. वयाच्या पन्नाशीतच आध्यात्मिक कार्यासाठी फर्मचा कार्यभार मुलाकडे सोपवला. कै.अप्पा केळकर यांनी वयपरत्वे विराम दिलेल्या "पदाअ" या उपक्रमाचे २००८ पासून "श्रीदाअ" म्हणून पुनरूज्जीवन केले व अध्यक्ष म्हणून २००८ ते २०१६ पर्यंत धुरा वाहिली. श्री. गानूसर कोथरुड येथील "भारतीय संस्कृती संगम" या संस्थेचे विश्वस्त आहेत. ते दर वर्षी इंटर्नशीप करणार्‍या आयुर्वेदीक डॉक्टरांना योगाचे प्रशिक्षण देतात.

श्री. दिलीप कृष्णाजी कोठारी.

एम.कॉम. डिफेन्स अकाउंट्स डिपार्टमेंट मधे ४० वर्षे नोकरी. सहायक नियंत्रक(Asst Controller) म्हणून निवृत्त. आधी पदाअचे तसेच २००८ पासून श्रीदाअचे कोषाध्यक्ष म्हणून २०१८ पर्यंत तसेच गानूसरांचे निवृत्तीनंतर २०१८ पर्यंत कोषाध्यक्ष व अध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी पार पाडली. या खेरीज, पदाअ उपक्रमाची पुस्तक छपाई, विक्री, कार्यालयात येणार्‍या पहिल्या स्वाध्यायाचे रजिस्ट्रेशन, त्यांना समीक्षक देणे, स्वाध्यायाचे समीक्षण करणे व अभ्यासार्थींना कळवणे अशा सर्व भूमिकांमध्ये त्यांनी योगदान दिलं आहे. सध्या ‘दासबोध सखोल अभ्यास’चे समीक्षक म्हणून काम करत आहेत.

श्री. सुहास आगरकर

आदरणीय अप्पांनी १९७९ साली सुरू केलेला ह्या उपक्रमात अगदी सुरवातीपासून होते समर्थभक्त आदरणीय कै. सुहास प्रभाकर आगरकर. त्यांनी २०१७ साली या उपक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारले. ही जबाबदारी स्वीकारण्या आधीपासून ते दासबोधाचा सखोल अभ्यास या उपक्रमाचे संचालकसुद्धा होते. या दुहेरी भूमिका त्यानी यशस्वीपणे पेलल्या. समर्थ भक्त आगरकर म्हणजे चालता बोलता दासबोधच! दासबोधातील कोणत्याही ओवीचा अर्थ, शब्द तसेच ओवी त्यांना विचारावी आणि त्यांना ते माहीत नाही असे कधीच झाले नाही. दासबोध त्यांचा श्वास होता, रक्तात दासबोध भिनला होता. श्रीसमर्थांवर संपूर्ण श्रद्धा ठेवून, सर्व काही श्रीसमर्थांवर कसे सोपवावे हे शिकावे त्यांच्याकडूनच! समर्थभक्त कै. आगरकर उत्तम वक्ते आणि संघटक होते. त्यांचे प्रवचन म्हणजे सर्व समर्थभक्तांना मेजवानीच असायची. सहज सोपी रसाळ भाषा, सोपी आणि सुटसुटीत विषय मांडणी तसेच अवघड आध्यत्मिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगणे ही त्यांची वैशिष्टये होती. शारीरिक व्यंगावर सहजपणे मात करून त्यांनी भारतभर भ्रमण करून श्रीसमर्थ विचार पूर्ण ताकदीने लोकांपर्यंत पोहोचवले. पुण्यातील गीता धर्म मंडळाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी काही काळ भूषवले होते.

‘आपण आवचितें मरोन जावें। मग भजन कोणें करावें। याकारणें भजनांस लावावे। बहुत लोक ।। १२-१०-३३||’ या उक्तीनुसार त्यांचे वागणे होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते तयार करून श्रीसमर्थ विचार लोकांपर्यंत कसा जाईल याचाच कायम विचार केला. कायमच नवनवीन संकल्पना स्वीकारायला त्यांनी कधी कुचराई केली नाही. समर्थभक्त कै. आगरकरांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाने जोमाने वाटचाल सुरू केली असतानाच त्यांचे डिसेंबर २०१८ साली ते श्रीसमर्थ चरणी लीन झाले. त्यांनी काठमांडू, नेपाळ येथे शेवटचा श्वास घेतला. अचानक असा निरोप घेण्याने श्री. दा.अ. या उपक्रमाची कधीही भरून न निघणारी हानी झाली. त्यांचे योगदान हा उपक्रम कधीही विसरू शकणार नाही.

श्री.वि.म.गाडगीळ

विजयराव गाडगीळ वय वर्षे ७६, हे आपल्या श्री.दा.अ. उपक्रमाचे विद्यमान संचालक आहेत. ते अप्पा केळकरांचे मेव्हणे,म्हणजेच गीताताईंचे धाकटे बंधू होत. सर मेकॅनिकल व इलेक्र्टिकल इंजीनियर असून त्यांनी पर्सनल मॅनेजमेंटमध्येदेखील पदवी संपादन केली आहे. त्यांनी ३३ वर्षे टाटा मोटर्स—टेल्को मध्ये ट्रेनिंग मॅनेजर म्हणून काम केले व ते २००५ मध्ये निवृत्त झाले. टेल्कोमधे त्यांनी हजारो कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. त्यांच्या शिकविण्याला दासबोधातील तत्वविचारांची चौकट असते. १९७८ पासून विजयराव श्री अप्पांबरोबर श्री.दा.अ. उपक्रमात कार्यरत आहेत. विजयरावांनी स्वामी चिन्मयानंदांच्या मार्गदर्शनाखाली वेदांताचा अभ्यास पूर्ण केला आहे. त्यात त्यांना प्रत्यक्ष स्वामी चिन्मयानंदांचा सहवासही लाभला आहे. विजयरावांची दासबोधा व्यतिरिक्त गीता ज्ञानेश्वरीवर प्रवचने चालू आहेत. गेली २० वर्षे त्यांच्या घरी नियमितपणे अभ्यासवर्ग चालू आहे. त्यात त्यांनी उपनिषदे, योगवसिष्ठ, मनाचे श्लोक, हरिपाठ, भागवत, तसेच आद्य शंकराचार्यांचा तत्वबोध, आत्मबोध, भजगोविंदम इत्यादी ग्रंथांचा अभ्यास करून घेतला आहे. सध्या ते श्री.दा.अ.चे संचालक आहेत व आपणा सर्वांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यांचा फोन नंबर: ९९२२०७३४३७ आहे.

दासबोध म्हणजे साक्षात समर्थ रामदासच....... !
अभ्यासक्रमातील त्या त्या समासांच्या नियमित वाचन, चिंतन, मननामुळे आणि समीक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विचारांना दिशा मिळते. सातत्यामुळे विचारातून आचार परिवर्तन होते. व्यक्तिमत्व विकास होतो. समर्थांनी स्वत:च म्हटल्याप्रमाणे “आता श्रवण केलियाचे फळ | क्रिया पालटे तत्काळ | तुटे संशयाचे मूळ | एकसरा || १-१-२८ || नियमित अभ्यासाचा संकल्प करून जरूर प्रवेश घ्या.