प्रपंच पडदा. . .



समर्थ भक्तीमार्गी, संन्यासवेषी साधू असले तरी ते प्रखर राष्ट्रभक्त होते. १७व्या शतकातील महाराष्ट्राची आणि एकंदरच हिंदुस्थानाची झालेली गलित अवस्था त्यांनी स्वत: पाहिली होती. जरी भगवंतानी अर्जुनाला उपदेश केला तरी युद्धात बाण अर्जुनानेच चालवले. त्यामुळे तत्कालीन काळातही समर्थ, तुकाराम महाराज आणि इतर अधिकारी सत्पुरुष असले; छत्रपती शिवाजी महाराजांसारखा कणखर राजा असला तरी सशक्त राष्ट्र उभारणी ही समाजाच्या एकत्रित प्रयत्नातूनच शक्य होती. म्हणून समाजात विशेषतः तरुणांमध्ये आलेली मरगळ झटकण्याचं काम समर्थांनी प्रामुख्याने केलं आहे. त्यांनी स्थापन केलेल्या मठांचा प्रमुख हेतू हाच होता.

मानवीदेहाचं सामर्थ्य समर्थ जाणून होते. हा मनुष्यदेह अलभ्य लाभ असला तरी त्याला अखेर आहे हेही लक्षात ठेवायला हवं. मरणाचं स्मरण ठेवून प्रपंच-परमार्थ दोन्हीकडे यश संपादन करावं यावर समर्थांनी दासबोध, मनाचे श्लोक तसेच स्फुट पदांतूनही उपदेश केला आहे. यशाचा थेट संबंध प्रयत्नांशी आहे. म्हणून समर्थांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला आहे. प्रयत्नाला खीळ बसवणाऱ्या आळस आणि आळसासोबत येणाऱ्या निद्रा आणि दुश्चितपणाचा भरपूर धिक्कार केला आहे(दासबोध द.८ स.६). प्रपंच-परमार्थ दोन्ही उत्तम करणारा समाज समर्थांना घडवायचा होता. समर्थ एका पदात म्हणतात,

प्रपंच पडदा पडली झांपड | राम दिसेना डोळा रे ||धृ||
दिवसा निजु निजु, रात्री निजु निजु | निज निज व्यर्थची गेले रे ||१||

या प्रपंचात आपण इतकं गुरफटून गेलो आहोत, इतक्या खटपटी करत आहोत की त्याचा थकवा आला आहे. डोळ्यावर जणू झापड आली आहे. त्यामुळे दृष्टी रामाला पाहत नाहीये. प्रपंचाची, विषयांची अशी भूल पडली आहे की, ऐहिकदृष्ट्या राम (ध्येय) आणि पारमार्थिकदृष्ट्या राम (आत्माराम) दोन्ही दिसत नाहीत. प्रपंच, विषय थेट बुद्धीवर परिणाम करतात, विचारशक्ती खुंटते. अशाने प्रपंचात वैभव तरी कुठून येणार? योग्य दिशेने कष्ट केल्याशिवाय फळ प्राप्त होत नाही हा सिद्धांत आहे. आपल्या अस्तित्वाच्या जाणीवेवरच पडदा पडल्याने नुसता आळस भरून राहिला आहे. आळसाने निद्रा इतकी अनावर झाली की दिवस-रात्र तिचीच सत्ता माणसावर चालते. ‘निद्रा’ ही अज्ञानाचं प्रतिक आहे. आयुष्याचा पूर्वार्ध-उत्तरार्ध म्हणजे दिवस-रात्र झोपेत म्हणजे अज्ञानात गेली. या देहाला-मनाला कधी ईश्वरचिंतनाचा वाराही लागू दिला नाही. जीवात्मा या शरीरात बंदिस्त झाला आणि पंचमहाभूतांच्या या पडद्याअलीकडेच निद्रिस्त झाला. त्यामुळे ‘निज’वस्तू – आत्मस्वरूप – जो राम तो प्राप्त झाला नाही. समर्थ पुढे म्हणतात,

दिवसां झोपी रात्री झोपी | झोपेने दिधला टोला रे ||२||
रामदास म्हणे व्यर्थची गेले | सार्थक नाही केले रे ||३||

आत्मस्वरूपाविषयीचं ज्ञानच पैलपार लावणारं आहे. आयुष्यभर अज्ञानात राहून एक दिवस स्वत:ला न जाणताच मृत्यू येतो. मृत्यूसमयी अज्ञानजन्य वासनाच प्रबळ ठरून त्यानुसार जन्म येतो. समर्थ म्हणतात, हा मनुष्यजन्म जन्ममृत्यूचं चक्र थांबवण्यासाठी आहे, नवीन जन्मांचा पाया भरण्यासाठी नाही. प्रपंच करताना शास्त्र-धर्माप्रमाणे आचरण केलं तर तो इतरांनाही सहाय्यक होतो, तेव्हाच त्याचं सार्थक होतं. एकनाथ महाराजांनी असा आदर्श प्रपंच केला. तेव्हा आपलं कल्याण याच जन्मात आपण नाही केलं तर या देहाचं काहीच सार्थक घडलं नाही, तो व्यर्थ गेला अशा परखड शब्दात समर्थ आपल्याला ‘जागं’ करतात.

जन्मसार्थक करून घेण्यासाठी प्रत्येक संतांनी तळमळीने उपदेश केला आहे. त्यातील जो रुचेल, जमेल तो नेटाने करावा. केवळ पडद्यापलीकडील रामाची प्राप्ती व्हावी, एवढे एकच ब्रीद डोळ्यांसमोर असावे. बाकी भ्रामक ब्रीदांचा त्याग करावा.

|| जय जय रघुवीर समर्थ ||


01/06/2021 | लेखन : श्री. आमोद रिसबूड


ब्लॉग कॅटेगरी