असा आहे सज्जनगड

सातारा शहरापासून नैऋत्यदिशेस सुमारे नऊ किलोमीटरवर हा सज्जनगड समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंचीवर उभा आहे. वरचा आकार शंखाकृती, सुमारे २८२४ यार्ड. सज्जनगडावर जाण्यासाठी सातारा बसस्थानकापासून दर एक तासाने बससेवा आहे. बस ही गडाच्या अंदाजे पाउणभाग चढून जाते. नंतर सुमारे १५० पायऱ्या चढून गेले की आपण गडावर पोहोचतो. सज्जनगडाच्या पायथ्याशी खाजगी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. ज्यांना पायऱ्या चढण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी डोलीची व्यवस्थासुद्धा आहे. तसेच आपले सामान गडापर्यंत वाहून नेण्यासाठी माणसेही असतात.

इतिहास

गड हा आदिलशहाच्या अनेक ठाण्यांपैकी एक ठाणे. अफझलखानाचा मुलगा फाझलखान इथे किल्लेदार असल्याचा उल्लेख इ.स. १६६२ च्या एका पत्रात सापडतो. इतिहासामध्ये या गडाची अनेक नामकरणे झाली. आश्वलायन ऋषींची ही तपश्चर्येची जागा म्हणून म्हणून याला आश्वलायन गड म्हणत असत. इथल्या रानातल्या अनेक अस्वलांवरून अस्वलगड म्हणू लागले. या गडाखाली परळी गाव आहे. यावरून याला परळीचा किल्ला म्हणू लागले. इ.स. १६७६ मध्ये श्रीसमर्थांचे या गडावर आगमन झाले. नंतर वर्षभर इथे संतमंडळींचा मेळावा भरला. तेव्हापासून या गडाचे सज्जनगड असे नामकरण झाले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीसमर्थ

श्रीसमर्थांचे सज्जनगडावर इ.स. १६७६ ते १६८२ असे सहा वर्षे वास्तव्य होते. आपल्या सद्गुरूंवर नितांत श्रद्धा आणि आदर याचे उदाहरण म्हणजे सज्जनगड. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळी किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. जेवढे किल्ले ताब्यात तेवढे आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य करणे सोपे होते. तरीसुद्धा शिवाजीमहाराजांनी हा किल्ला श्रीसमर्थांना वास्तव्यासाठी कायमस्वरूपी देऊन टाकला. यावरून श्रीसमर्थ आणि छत्रपती यांचे नाते कसे होते याचा अंदाज येतो. आजही ऐतिहासिक कागदपत्रात तशी नोंद आढळते.

राजा शिवछत्रपती समर्थांसी अत्यंत प्रीती |
सज्जनगडी त्यांची वस्ती तेणें करविली ||

-श्रीसमर्थशिष्य भीमस्वामी

विवेके शिवराजे, समर्थांसी विनविले सज्जनगडी रहावे गुरुदेवे |
पूर्वी ऋषीचे गुप्तस्थान येथे समर्थे करावे अधिष्ठान |

-श्रीसमर्थशिष्य गिरीधरस्वामी

गडावर श्रीसमर्थ भक्तांचे स्वागत!

गडावर चढण्यास सुरुवात केल्यानंतर काही वेळानंतर सर्वप्रथम ‘श्रीशिवाजी महाराज महाद्वार’ स्वागतासाठी उभे आहे. पुन्हा काही पायऱ्या चढल्यावर गडाचे मुख्य प्रवेशद्वार ‘श्रीसमर्थ महाद्वार’ लागते. हे महाद्वार लागण्याआधी गायमारुती देवळाजवळून उत्तरेस एक पायवाट जाते. तिथे सुमारे एक फर्लांगभार डोंगरकड्यांतही श्रीसमर्थांची एकांतात बसायची श्रीरामघळ म्हणजे गुहा आहे. तिचा आकार गोमुखासारखा आहे. सध्या आतमध्ये माती साठून गुहा बंद होण्याच्या मार्गावर आहे.

खनाळामध्ये जाउन राहे तेथे कोणीच न पाहे सर्वत्रांची चिंता वाहे| सर्वकाळ ||दा. १५-२-२३||

महाद्वार ओलांडण्यापूर्वी ‘जय जय रघुवीर समर्थ’ याचा मोठ्याने घोष करावा आणि येणारी स्फूर्ती, जोश अनुभवावा अशी ही जागा. पुढे १०-१५ पायऱ्या चढल्यावर ‘लोकमान्य टिळक स्मृती कमान’ आपले गडावर स्वागत करते. लोकमान्य टिळक गडावर येत असत. त्यांचा दासबोधाचा गाढा अभ्यास होता. श्रीसमर्थांनी सांगितलेल्या ‘राजकारणा’नुसार ते वागले. पारतंत्र्याच्या काळात इथूनच ‘वन्ही तो चेतवावा रे’ ही समर्थप्रेरणा अंगीकारून अवघ्या देशात टिळकांनी असंतोषाचा अग्नी चेतवला.

अंग्लाईदेवीचे मंदिर

ही कमान ओलांडून पुढे गेल्यानंतर सुरुवातीला एक तळे दिसते. त्याचे नाव घोडाळे तळे. घोड्यांना व इतर जनावरांना पाणी पाजण्यासाठी याचा उपयोग करत. या तळ्याला लागून डावीकडे एक छोटी पायवाट जाते. त्या वाटेने गेल्यावर डाव्या हाताला ‘अंग्लाई’ देवीचे मंदिर आहे. पूर्वी या मंदिराचे दगडी बांधकाम होते. आता याची डागडुजी करून नुतनीकरण केले आहे. ही देवीची मूर्ती श्रीसमर्थांना अंगापूरच्या डोहात सापडली. परचक्र आल्यामुळे देवीची आणि प्रभूरामचंद्रांची मूर्ती अंगापूरच्या डोहात टाकण्यात आली. प्रत्यक्ष देवीने श्रीसमर्थांना स्वप्नात दृष्टांत दिला व त्या मूर्तींना बाहेर काढण्यास सांगितले. श्रीसमर्थांनी स्वत: त्या दोन्ही मूर्ती बाहेर काढल्या. प्रभूरामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना चाफळ येथे केली तर देवीची स्थापना सज्जनगडावर केली. अंगापूरच्या डोहात सापडल्यामुळे अंग्लाई किंवा अंगाईदेवी असे नामकरण झाले. या देवीचे रूप खूप मोहक असून ती काळ्या पाषाणातील आहे. याच मंदिरात बसण्यासाठी एक ओटा आहे. मंदिर गडाच्या एका बाजूला असल्यामुळे श्रीसमर्थ आणि शिवाजी महाराजांच्या गुप्त बैठका तेथे होत.

कल्याण उडी स्मारक

देवीच्या मंदिरासमोर धर्मध्वज आहे. तेथून दिसणारा सूर्योदय डोळ्यांचे पारणे फेडतो. तिथे उभे राहिले असता समोर अजिंक्यतारा किल्ला दिसतो. लोकमान्य टिळक कमानीच्या उजवीकडे एक रस्ता जातो. तेथे कल्याण उडी स्मारक आहे. एकदा श्रीसमर्थ आपल्या शिष्य मंडळींसोबत तिथे उभे असताना आलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे त्यांची छाटी उडाली.त्या वेळी त्यांनी फक्त ‘कल्याणा, छाटी!’ असे उद्गार काढले. क्षणाचाही विलंब न करता श्रीसमर्थांचे अंतरंग शिष्य कल्याणस्वामींनी छाटी पकडण्यासाठी कड्यावरून उडी घेतली. कल्याणस्वामी आता काही परत येत नाहीत असे सर्वांना वाटले. परंतु कल्याणस्वामी थोड्यावेळाने प्रवेशद्वारातून छाटी घेऊन आले. केवढा सद्गुरुंवर विश्वास!

असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा ||

श्रीसमर्थ गडावर येण्यापूर्वीच्या वास्तू

लो.टिळक कमानीपासून सरळ गेले की उजव्या हाताला सोनाळे तळे लागते. त्या पाण्याचा वापर गडावर पिण्यासाठी करतात. या तळ्याच्या बाजूलाच पेठेतला मारुती आहे. श्रीसमर्थ गडावर येण्याच्या पूर्वीची ही वास्तू आहे. या मंदिरासमोर श्रीधरकुटी आहे. येथे श्रीधरस्वामींचे वास्तव्य होते. तिथे त्यांच्या पादुका आहेत.

शेजघर

मुख्य रस्त्याने पुढे गेल्यावर दोन वास्तू दिसतात. एक शेजघर आणि त्याच्या बाजूला भव्य समाधीमंदिर. श्रीसमर्थ या शेजघरात राहत होते. इथे त्यांचे ६ वर्षे वास्तव्य होते. श्रीसमर्थ जेव्हा गडावर राहण्यास आले तेव्हा जिजोजी काटकर गडाचे किल्लेदार होते. आज या वाड्यात श्रीसमर्थांनी वापरलेल्या वस्तू पाहायला मिळतात. त्यात शिवाजी महाराजांनी दिलेला पलंग पाहण्यास मिळतो. श्रीसमर्थांचं अस्सल चित्र पाहायला मिळत. श्रीसमर्थ तंजावरला असताना श्रीसमर्थशिष्य मेरुस्वामी यांनी ते काढले आहे. हेच अधिकृत चित्र म्हणून सगळीकडे वापरले जाते. श्रीसमर्थांचा दंड, पानाचा डबा, पिकदाणी, तांब्या, होमकुंड पाहण्यास मिळतं. गोरक्षनाथानी दिलेली छडी, दत्तात्रयांनी तसेच शिवाजी महाराजांनी दिलेली कुबडी येथे आहे.

श्रीसमर्थांना कफाची व्याधी होती. वैद्यांच्या सल्ल्यानुसार ते तांबूलसेवन करत. गडावर नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत नाही. त्यामुळे वाहते पाणी प्यावे असा सल्लासुद्धा वैद्यांनी दिला होता. श्रीसमर्थांचे शिष्य कल्याणस्वामी दोन हंडयांतून उरमोडी नदीचे पाणी रोज गडावर कावड भरून घेऊन येत. ते दोन हंडेसुद्धा पहावयास मिळतात. यावरून कल्याणस्वामींच्या ताकदीची कल्पना येते.

श्रीसमर्थ हिमालयात असताना त्यांना थंडीचा त्रास जाणवू लागला. त्यावेळी त्यांनी हनुमंतांची प्रार्थना केली. हनुमंत प्रकट झाले व त्यांना जी वल्कले दिली तीही आपण पाहू शकतो. इथे एक मातीचा ओटा असून सध्या मुख्य मंदिरात विराजमान झालेलेया श्रीरामाच्या मूर्ती प्रथम त्यावर ठेवल्या होत्या.

वृंदावन आणि अशोकवन

मुख्यमंदिरासमोर असलेल्या भागास अशोकवन म्हणतात. तिथेच श्रीसमर्थशिष्या अक्कास्वामी यांचे वृंदावन आहे. श्रीसमर्थांनंतर त्यांनीच हा किला ३२ वर्षं सांभाळला. शेजघर आणि मुख्यमंदिर यामधून एक छोटा रस्ता पुढे जातो. तेथे श्रीसमर्थशिष्या वेण्णास्वामी यांचे वृंदावन आहे.

धाब्याचा मारुती व ब्रह्मपिसा

तिथून अजून पुढे गेले असता उरमोडी नदीचे भव्य पात्र दृष्टीस पडते. हिचे मूळ नाव उर्वशी पण अपभ्रंश होऊन उरमोडी झाले. डाव्या हाताला एक मंदिर दिसते, ते आहे धाब्याच्या मारुतीचे.

धाब्याचा मारुती आहे गडाच्या दक्षिण दिशेला, जिथे तटबंदी नाही. ‘इथे तटबंदीची गरज नाही. या भागाचे माझा मारुतीराय रक्षण करील’ असे श्रीसमर्थांनी शिवाजी महाराजांना सांगितले होते. या मंदिराच्या जवळ ब्रह्मपिसा स्मारक आहे. श्रीसमर्थांनी गडावर शिष्यांच्या अनेकदा परीक्षा घेतल्या आहेत. एकदा श्रीसमर्थांनी अंगाला शेंदूर फासून मळवट भरला व उग्ररूप धारण केले. तलवार हातात घेतली व म्हटले, ‘जो कुणी पुढे येईल, त्याचे मुंडके उडवीन’. सर्व शिष्य घाबरले व पुढे येण्यास कुणी तयार होईना. त्यावेळी चाफळ येथे असलेल्या कल्याणस्वामींना बोलावले. त्यांनी हा प्रकार पाहिला. ते श्रीसमर्थांसमोर हात जोडून उभे राहिले. ‘जर सद्गुरूंच्या हातून मरण येणार असेल तर त्यासारखे अन्य भाग्य कोणते?’ असं म्हटल्यावर श्रीसमर्थांनी उग्र अवतार टाकला व कल्याणास जवळ घेतले. हेच ते ब्रह्मपिसा स्मारक.

समाधीमंदिर आणि श्रीराममंदिर

सज्जनगडावरील प्रमुख वास्तू म्हणजे देवालय. हे शेजघराच्या बाजूलाच आहे. याठिकाणीच श्रीसमर्थांवर अंत्यसंस्कार झाले. आज समाधीमंदिराच्या वर दिसणाऱ्या रामपंचायतन मूर्ती श्रीसमर्थांनी अवतार कार्य संपवण्याच्या चार दिवस आधी गडावर आलेल्या आहेत. या मूर्ती तंजावरचे अंधमूर्तिकार अर्णीकर यांनी श्रीसमर्थांनी सांगितल्या तशा तयार केल्या आहेत. त्यांना श्रीसमर्थांनी दृष्टी दिली व ह्या पंचधातूच्या मूर्ती तयार करवून घेतल्या. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे राम-लक्ष्मणाच्या मूर्तीला नऊ घुंगरू आहेत. श्रीसमर्थांनी त्यांची तीन दिवस पूजा केलेली आहे.

श्रीसमर्थांचे निर्वाण

श्रीसमर्थांनी ठरवून अवतारकार्य संपवलं आहे. त्यांनी माघ वद्य सप्तमी इ.स. १६८२ यादिवशी सर्व शिष्यमंडळींना एकत्र बोलावले. त्यावेळी ते फक्त म्हणाले –

रघुकुळटिळकाचा वेध सन्निध आला | तदुपरी भजनासी पाहिजे संग केला |

त्यांच्या बोलण्याचा अर्थ त्यांचे अंतरंगशिष्य उद्धवस्वामींना समजला. त्यांनी लगेच उत्तर दिले-

अनुदिनी नवमी हे मानसी धरावी | बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी |

म्हणजे माघ वद्य नवमी(दासनवमी) यादिवशी दुपारी १२ वाजता श्रीसमर्थ अवतारकार्य संपवणार हे सर्वांना समजले. त्यावेळी उद्धवस्वामी आणि अक्कास्वामींच्या डोळ्यात पाणी आले. त्यावेळी श्रीसमर्थांनी शेवटचा संदेश दिला-

माझी काया माझी वाणी गेली म्हणाल अंत:करणी | परी मी आहे जगज्जीवनी निरंतर || आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वत:सिध्द | असता न करावा खेद भक्तजनी || नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट | तेणे सायुज्यतेची वाट गवसेल की ||

म्हणजे आजही श्रीसमर्थ आपल्यात दासबोधाच्या रूपाने आहेत.

माघ वद्य नवमी दुपारी १२ वाजता श्रीसमर्थ पद्मासनात बसले आहेत. हर हर हर असा उच्चार करून त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यावेळी त्यांच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडली व श्रीरामाच्या मूर्तीत विलीन झाली. गडावर एक खड्डा होता, तिथे अंत्यसंस्कार केले गेले. दुसऱ्या दिवशी तिथेच आज जी आपण पाहतो ती स्वयंभू समाधी वर आली. श्रीसमर्थ आज्ञेनुसार कल्याणस्वामी डोमगावला गेले होते. पण माउली आता या जगात नाहीत हे समजल्यावर ते वाऱ्याच्या वेगाने गडावर आले आहेत. ते धावत समाधीपाशी गेले व ‘माउली!’ असा हंबरडा फोडून समाधीला मिठी मारली आहे. त्यावेळी श्रीसमर्थ समाधीतून प्रकट झाले व त्यांनी कल्याणस्वामींना दर्शन दिले. ते समाधीतून बाहेर आले तेव्हा समाधीला चीर गेली, ती आता वज्रलेप करून बुजवली आहे. अलीकडच्या काळात श्रीसमर्थांनी श्रीधरस्वामींनासुद्धा समाधीमंदिरात दर्शन दिलं आहे.

श्रीसमर्थांच्या निर्वाणानंतर

आज दिसणारे समाधीमंदिर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधले आहे. ३० एप्रिल १७०० रोजी मुघलांनी सज्जनगडावर हल्ला केला. त्यावेळी भिकाजी जाधव व गोविंद महादेव गोडबोले यांनी निकराने हा किल्ला लढवला. शेवटी अन्नधान्य संपल्यामुळे रामचंद्र नीलकंठ अमात्य यांच्या सांगण्यावरून मराठ्यांनी गड सोडला. तत्पूर्वी गडावरील परशुराम त्रिंबक हे उद्धवस्वामींसह श्रीरामपंचायतनाच्या मूर्ती घेऊन वासोट्यास गेले. जाताना समाधीचे दार बेमालूम चिणले. औरंगजेबाने गडाचे नाव नवरसतारा ठेवले. दि. १६-६-१७०० मध्ये औरंगजेबाने गड सोडला. परशुरामपंतांनी गड परत घेऊन श्रीरामपंचायतनाची पुनर्स्थापना केली.


आजही गडावर नित्यनैमित्तिक उपासना सुरु असते. रुद्राच्या मंत्रोच्चाराने आजही समर्थांच्या समाधीची पूजा होते. शेकडो श्रीसमर्थभक्त गडावर येत असतात. गडावर आजही विनामूल्य निवास व भोजन यांची व्यवस्था आहे. अनेक रामदासीमंडळी श्रीसमर्थ आणि भक्तांच्या सेवेत रत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने एकदातरी सज्जनगडावर जावे,तिथली माती कपाळास लावावी व धन्य होऊन जावे. आजही श्रीसमर्थ गडावर आहेत. ते सर्वांची वाट पाहत असतात. असे हे श्रीसमर्थ भक्तांचे माहेर! गड सोडताना नकळत अभंग आठवतो – ‘कन्या सासुरासी जाये | मागे परतोनी पाहे |’ गड उतरताना डोळ्यात पाणी तरळते व मन पुन्हा निर्धार करते. पुन्हा यायचेच सज्जनगडावर!