घरा-घरातून श्री समर्थांचे भव्य दिव्य विचार पोचवावे, समाजात समर्थांची विचारधारा रुजवावी, परत एकदा शिवराज्य-रामराज्य यावे, गर्तेकडे चाललेल्या भोगवादी चंगळवादी समाजाला सावरावे, समर्थांच्या वाणीत सांगायचे तर ‘शहाणे करून सोडावे सकळ जन!’ अशी समाजप्रबोधनाची आस मनी धरून कै.स.भ.द्वा.वा. केळकर व गीताताई  केळकर यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला. चाळीस वर्षांपूर्वी लावलेले हे रोपटे बघता बघता त्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. हजारो विद्यार्थी देशातून व परदेशातून वेगवेगळ्या भाषातून आज ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास करत आहेत. सर्वसामान्यांना या उपक्रमामुळे दासबोधाचा अभ्यास करावासा वाटतो हे त्या अप्पांचे खरे यश आहे. एरवी बासनात बांधून देवघरात हा ग्रंथ ठेवलेला असे. त्याची नुसती पूजा करायची नसून तो व्यवहारात आचरणात आणावयाचा शैक्षणिक ग्रंथ आहे हे लोकांना पटविण्यात अप्पा यशस्वी झाले. अनेकांना या अभ्यासाने भरकटलेल्या मनाला दिलासा मिळाला, निराश मनाला उभारी मिळाली, उत्तम जगण्याची ईर्षा उत्पन्न झाली. अनेक आयुष्ये उजळली आहेत. मनाच्या श्लोकासारखा मानसोपचार परत मिळाला आहे. श्रीसमर्थांची शिकवण त्रिकालाबाधित आहे. आता इंटरनेटवरून.... ईमेलद्वारेसुद्धा आमची तरुण पिढी अभ्यास करते आहे. आज अप्पा आपल्यात नाहीत. २०१५ साली गुरुपौर्णिमेच्याच दिवशी ते समर्थ चरणी लीन झाले. केळकर पती पत्नी पूर्वी दोघेही शाळेत अध्यापनाचे कार्य करीत होते. सर विज्ञानाचे शिक्षक होते, शाळेशाळेतून त्यांनी प्रयोगातून विज्ञान सुरु केले. मुलांच्या विचारांना चालना मिळेल अशी पुस्तके लिहिली. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाची दाखल घेत ‘आदर्श शिक्षक’ म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुरस्कार मिळाला. या सर्व कार्यात  अप्पांच्या पत्नी गीताताई सहभागी होत्या, त्यांचे संपूर्ण कुटुंबच यात सहभागी झाले. मुलगा डॉ.विक्रम, स्नुषा सौ.वैदेही, नातू प्रबोध सगळेच सक्रिय होते. 

तळागाळापर्यंत ग्रामीण भागापर्यंत हा अभ्यास पोचावा म्ह्णून अप्पांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी (कै. सुनीलदादा चिंचोलकर, कै. स.भ.गानू काका, श्री व सौ कोठारी, कै. सुहासदादा आगरकर, श्री गाडगीळ सर, कै.स.भ.केंदुरकर व श्रीमती केंदूरकर, श्री म.वि.जोशी, कै.श्री व सौ. वैद्य आणि अनेक समर्थ भक्त जीवाचे रान केले. उपक्रम वाढला तसे त्याचे विभागवार केंद्र स्थापन केले. त्यावर केंद्रप्रमुख म्हणूनही तशाच तोलामोलाचे निस्पृह भक्त महंत मिळाले. मुख्य म्हणजे समर्थ सेवा मंडळाचे प्रथमपासून प्रचंड सहकार्य मिळाले. ‘सज्जनगड’ मासिकातून या उपक्रमाची सुरुवात झाली. श्रीसमर्थ सेवा मंडळाचे स.भ. कै. बन्याबापू गोडबोले, समर्थलीन अण्णाबुवा कालगावकर, यांनी अप्पांना सर्वतोपरी सहकार्य केले. कै.स.भ.मारुतीबुवा रामदासी, स.भ.अरुणराव गोडबोले यांनीही हा उपक्रम उचलून धरला. सज्जनगड मासिकाचे संपादक कै. स.भ.वसंतराव वैद्य, विद्यमान संपादक स.भ.अजितदादा कुलकर्णी यांनी तर हा उपक्रम आपलाच मानला. नवीन नवीन प्रयोग करून सज्जनगड मासिकाला शिखरावर नेणारे मधुकाका नेने या सर्वांनीच या उपक्रमाला आपलेसे करून हिरिरीने प्रचार केला व करत आहेत.

सध्या समर्थ सेवा मंडळाचे संचालक आ.स.भ. योगेशबुवा व श्रीमत् ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रमाचे अध्यक्ष स.भ.श्री.सुहास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग्रंथराज दासबॊध उपक्रम’ सर्व भारतातील व परदेशातील केंद्र-संचालकांच्या सहकार्याने प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.